कोरोनामुक्त.... काढली मिरवणूक, दोनशे जणांवर गुन्हा दाखल...

Foto


फटाक्यांची आतषबाजी अन कोण आला रे कोण आलाचा जयघोष...कोरोना मुक्त झालेल्या एमआयएम नेते आणि माजी उपनगराध्यक्षांच्या समर्थकांनी काल रविवारी रात्री वैजापुरात चक्क मिरवणूक काढली. एखाद्या अभिनेत्याला शोभेल अशा थाटात माजी उपनगराध्यक्ष अखिल शेख यांनी हात वर करीत समर्थकांचे अभिवादन स्वीकारले. सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः धुराळा उडवीत निघालेल्या या मिरवणुकीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वैजापूर पोलिसांनी या प्रकरणी तब्बल दोनशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
वैजापुरचे माजी उपनगरअध्यक्ष व एमआयएमचे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले. ते शहरात येणार असल्याने समर्थकांनी स्वागताची जंगी तयारी केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास वैजापुरातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांचे आगमन होताच शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारला गराडा घातला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी सुरू केली. कौन आया... कौन आया... शेर आया...शेर आया... च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.  दर्गाबेस येथील शेख यांच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ही बराच वेळ कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करीत होते. या दरम्यान सोशल डिस्टनसिंगचा  फज्जा उडाला. विशेष म्हणजे ज्या भागात  शेख हे राहतात तो भाग कंटेन्मेंट झोन आहे. त्या भागाला सील करण्यात आले आहे असे असताना देखील सर्व नियम मोडत जमावबंदी आदेश झुगारात ही मिरवणूक काढण्यात आली.रात्री उशिरा या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात  शेख यांच्यासह २०० समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची बघ्यांची भूमिका...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते दर्गाबेस हा मिरवणुकीचा अंतर सुमारे पाऊण किलोमीटरचे आहे.रस्त्यातच वैजापूर पोलीस ठाणे लागते. सर्व आदेश धाब्यावर बसवत मिरवणूक पोलिसादेखत ठाण्यासमोरून गेली. मात्र ठाण्यातील एकाही अधिकारी- कर्मचऱ्याने या मिरवणुकीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्या नंतरही अनेक तास घोषणाबाजी तसेच रस्त्यावर गर्दी होती.

कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स काढून फेकले...

 दर्गाबेस परिसर मध्ये मोठ्याप्रमाणात कोरोनाबधित रुग्ण असल्याने हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. त्यामुळे परिसराला सील करण्यात आले होते. मात्र शेख यांच्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स काढून फेकले. सकाळी पुन्हा प्रशासनाला आज सकाळी पुन्हा लावावे लागले.